Pages

प्रास्ताविक

प्रास्ताविक गरुडझेप लेखन



                                    

              शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये प्रगतीशील राज्य म्हणून गणले जाते.तसेच या राज्यात शिक्षणक्षेत्रात जे जे घडते, त्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. सदयपरिस्थितीत सातारा जिल्हयातील बहूतेक उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत किंवा चर्चिले जात आहेत. शिक्षणातून अपेक्षित व्यक्तीमत्वविकास साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम महत्वाची भूमिका बजावतो. कोणत्या वयात काय, किती आणि कसे शिकायचे हे अभ्यासक्रम निश्चित करीत असल्यामुळे अभ्यासक्रम हा शिक्षणाच्या गुणवत्तेचे अविभाज्य अंग आहे.त्यामुळे सुयोग्य आणि परिपक्व अशा उपक्रमांची निर्मिती ही गुणवत्ता साधण्याच्या वाटेवरचे महत्वाचे पाऊल ठरते .समाजाच्या गरजा व आशा आकांक्षा,-समाजाचा इतिहास, वैज्ञानिक प्रगती, इतर सामाजिक व राजकिय घडामोडी , शिक्षणशास्त्रामधील प्रगती, राष्ट्रीय व राज्याची धोरणे यांची दखल घेऊन राबविले जाणारे उपक्रम कालसुसंगत व दर्जेदार होतात.
            सातारा जिल्हयातील आमच्या खंडाळा विकास गटात याच पध्दतीने नाविण्यपूर्ण काम होण्याच्या दृष्टीने आजमितीस जे आवश्यक आहे असे सर्व बदल प्राथमिक शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये करण्याचे ठरले. महाराष्ट्र राज्यात सन-2000 पासून सर्वच प्राथमिक शाळांमध्ये इ.1 ली पासूनच इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे.. परंतू गेल्या 16 वर्षात जी अपेक्षीत प्रगती पाहिजे होती ती मिळाली नाही. आजमितीस महाराष्ट्र राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे जाळे वाढत आहे त्यामुळे शासकीय शाळांचा पट तसेच शिक्षक संख्या कमी होताना दिसत आहे. ही विदारक परिस्थिती लक्षात घेऊन खंडाळा विकास गटात सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी असा एक ध्येयलक्षी उपक्रम चालू करण्याची हाक सर्व शिक्षकांना दिली त्याला सर्व शिक्षकांनी तितक्याच तत्परतेने प्रतिसाद दिला. या उपक्रमातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात जोमाने पुढे पाऊल टाकून खंडाळा तालुक्यातील जि.प. शाळांमधील विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचे स्वप्न यंत्रणा पाहत असून त्यासाठी कटीबध्द होत आहेत.
                    इंग्रजी शाळेत प्रवेश कशाला
                   प्राथमिक शाळा आहे उशाला
                   शाळा आमची खुपच छान
                   तीच मिळवून देईल मान !

          तालुक्यातील सर्वच जि.प. व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये एकसुत्रता व शिस्त येण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची कार्यवाही एकसारखीच होणे आवश्यक आहे. तसेच अंगणवाडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण पूर्वप्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने विदयार्थी विकासाचे अविभाज्य अंग आहे. हे ओळखून पूर्व प्राथमिक शिक्षणात परिस्थितीनुसार बदल करणे क्रमप्राप्त आहे. ज्या ज्या ठिाकाणी प्राथमिक शाळेला अंगणवाडी जोडून आहे तेथील अंगणवाडीचा आढावा घेणे, अभ्यासक्रमाचे नियोजन करणे, तेथील शिक्षिकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून साहाय्य देणे. सर्व शिक्षकांची मते विचारात घेऊन त्यांना Spoken English,Technosavvy etc. विषयाचे प्रशिक्षण देणे तसेच विषयनिहाय कार्यशाळा/ऊद्‌बोधन वर्गांतून शिक्षकांना अधिक सक्षम करणे.
           अशा विविध पध्दतींचा अवलंब करून प्राथमिक शिक्षणामध्ये बदल घडून सर्व शासकिय शाळा अधिक सक्षम व कार्यक्षम होतील,विदयार्थ्यांचा ओढा जि.प.शाळांकडे वाढेल, विदयार्थी शाळेत टिकतील व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी सक्षम होऊन बाहेर पडतील.
उदिष्टे :-
1)    तालुक्यातील  सर्व जि.प. व्यवस्थापनाच्या शाळेतील विदयार्थी, शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्या गणवेशामध्ये एकसारखेपणा आणून समानतेची व ऐक्याची भावना निर्माण करणे.
2)    खाजगी संस्था व कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीमधून (CSR) अंतर्गत निधी उपलब्ध करून सर्व शासकीय शाळांना आवश्यक ती मदत मिळवून देणे.
3)    शिक्षण विभागासहित इतर सर्व शासकीय विभाग तसेच तालुक्यातील स्थानिक कलाकार,कलावंत व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन जि.प. शाळांमध्ये सुधारणा करणे.
4)    विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विषयनिहाय कृतिकार्यक्रमांची आखणी करून अंमलबजावणी करणे.
तालुकास्तरावर शैक्षणिक मार्गदर्शनासाठी  विविध विषयाच्या प्रशिक्षण मंडळांची स्थापना करणे.                       
कार्यक्रमाची व्याप्ती :-
              खंडाळा विकास गटातील सावित्रीच्या पावन जन्मभूमीतील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. शिक्षकांचे विदयार्थ्यांशी  वर्तन अत्यंत प्रेमाचे आणि आपुलकीचे असावे लागते. विदयार्थ्यांची कोवळी मने फुलविण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. यासाठी शिक्षकांच्या प्रेमळ वागणूकीची नितांत आवश्यकता आहे. विदयार्थ्यांचे शालेय जीवन हे केवळ ज्ञानसंपन्न करावयाचे नाही तर,ते आनंदमय कसे होईल याचा विचार प्रत्येक शिक्षकाला करावा लागतो. किंबहूना त्यांनी तो करावा हेच गरूडझेप सावित्रीच्या खंडाळयाची या शैक्षणिक क्रांतीमध्ये अपेक्षित आहे.
              शिक्षकांनी आपल्या अध्यापन व आचार-विचार पध्दतीमध्ये परिवर्तन करून विदयार्थ्यांमध्ये परस्परांबददल प्रेम,जिव्हाळा,सहिष्णूवृत्ती व दुस-याच्या मतांचा व दृष्टीकोनांचा आदर करण्याची वृत्ती,स्वयंस्फूर्तीने शिकण्याची वृत्ती इ. बाबी विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचा सतत प्रयत्न असला पाहिजे. जेणेकरून विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल. सामान्य ज्ञानात भर पडून बौध्दिक क्षमता वाढीस लागेल.गावातील सर्व मुले गावात असणा-या जि.प.च्या शाळेतच येतील यासाठी वैशिष्टपूर्ण उपक्रम राबविणे,कंपन्यांमधील किरकोळ काम करणारे कामगार,बांधकाम मजूर,उघडया माळावरील वसाहतीमधील मुलांना या शाळेत आणण्यासाइी प्रयत्न करणे. शाळेतील 100 टक्के विदयार्थी प्रगत घेऊन पुढील शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतील याची खात्री करणे.विदयार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून एखादा विदयार्थी विशिष्ट बाबतीत कला गुणात जाण्यात हुशार आहेत हे पाहून पालकांच्या साहाय्याने त्याच्या पुढील विशेष शिक्षणाची सोय करणे. हे करण्यासाठी काही वेळा चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करावे लागणार आहेत.
                 या सर्व गोष्टींचा विचार करता विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून गुणवत्तेतील काही महत्वपूर्ण घटकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment